साउदम्पटन – भारत व न्यूझीलंड या दोन्ही संघांची क्षमता समान आहे. केवळ त्यांच्याकडे रवीचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा हे दोन मोहरे नाहीत. आणि तेच या सामन्यात ट्रम्पकार्ड ठरतील, असा इशारा विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी न्यूझीलंड संघाला दिला आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून भारतीय संघाच्या या दोन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने प्रतिस्पर्धी संघाला दडपणाखाली ठेवले आहे. केवळ ते गोलंदाज म्हणून नव्हे तर खरेखुरे अष्टपैलु खेळाडू म्हणून नावारुपाला येत आहेत.
या दोघांनी यंदाच्या मोसमात सातत्याने सरस कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्यांनी संघाला गरज असताना धावाही केल्या आणि बळी घेण्याची वेळ अल्यावर समोरच्या संघाची फलंदाजीही उद्ध्वस्त केली आहे. या दोघांचीच कामगिरी या सामन्यात निर्णायक ठरेल, असेही गावसकर म्हणाले.