मतमोजणीत आठव्या फेरीनंतर रवींद्र धंगेकर यांनी घेतली निर्णायक आघाडी
कसबा पेठ मतदारसंघात तीन दशकानंतर सत्तांतर
पुणे – कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजप या वळणावर गेल्यानंतर ही निवडणूक चुरशीची होणार, हे निश्चित झाले होते. त्यामुळे मतमोजणी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकविणारी ठरणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते.
हेच चित्र मतमोजणीच्या आठव्या फेरीपर्यंत कायम राहिल्याने कसब्यात मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात पडणार याबाबत सगळ्या राज्याची उत्सुकता शिगेला लागली होती. मात्र 20 फेऱ्यांच्या मतमोजणीत आठव्या फेरीपासून धंगेकर यांना निर्णायक मते मिळत गेल्याने शेवटच्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम ठेवत त्यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा 10 हजार 915 मतांनी पराभव केला. या निकालाने भाजपचा “निकाल’, तर कॉंग्रेसला “सुकाळ’ अशीच प्रतिक्रिया सर्वस्तरातून उमटली.
पुणे – कसबा विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा 32 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. 1991-92 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत तत्कालीन भाजपचे उमेदवार गिरिश बापट यांनाही कॉंग्रेसचे उमेदवार तात्या थोरात यांनी साडेपाच हजार मतांनी पराभव केला होता. दरम्यान, 2014 च्या मोदी लाटेत पुण्यात कॉंग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. तर 2019 मध्येही कॉंग्रेसच्या उमेदवारांना शिवाजीनगर आणि कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर 9 वर्षांनी शहरात कॉंग्रेसचा आमदार निवडून आला आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसब्याची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या पोटनिवडणुकीतही भाजपला पराभव पत्कारावा लागेल, अशी चर्चा होती. मात्र, 2014 2017 ची महापालिका निवडणूक 2019 ची लोकसभा आणि विधानसभा यात भाजपला या मतदारसंघात विक्रमी बहुमत मिळाल्याने या पोटनिवडणुकीत वेगळे चित्र राहिल अशी चर्चा होती.
त्यामुळे, भाजपला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेस- शिवसेना- राष्ट्रवादी कसब्यात पूर्ण ताकदीने उतरलेली होती. त्यामुळे भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची करत भाजपचे हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये काही दिवस मुक्काम ठोकलेला होता. घेऊन मिळावे घेऊन जोर लावला होता. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केल्याचा आरोप देखील कॉंग्रेसने केला होता. तर भाजपची यंत्रणा कामाला लागल्याने ही निवडणूक चुरशीचीच होईल, असे सांगितले जात होते.
2019 मध्ये मुक्ता टिळकही 21 हजार मतांनी विजयी झाल्या होत्या. मात्र, 2019 ची विजयी आघाडी मोडीत काढत रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी झाले आहेत.
महापालिका ते विधानसभा…रवींद्र धंगेकर यांचा राजकीय प्रवास
पुणे – कसबा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र हेमराज धंगेकर हे गेली 25 वर्षे महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत.
12 मार्च 1968 जन्मलेल्या धंगेकर यांचे शिक्षण 8 वी पर्यंत झाले असून, त्यांचा मुख्य व्यावसाय शेती आहे. धंगेकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात शिवसेना मधून केली. 1997, 2002 या निवडणुका शिवसेनेकडून लढविल्या तर 2005 मध्ये मनसे मध्ये प्रवेश केला आणि 2007 व 2012 ची महापालिका निवडणूक मनसेकडून लढविली.
पुढे धंगेकरांनी 2017 मध्ये महापालिका निवडणूक कॉंग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून लढविली. तर 2009 व 2014 ची विधानसभा निवडणूक मनसेकडून लढविली. त्यात त्यांना 2007 मध्ये तब्बल 47 हजार मते मिळाली तर 2014 मध्ये 26 हजार मते मिळाली. दोन्ही वेळी पराभवाचा समाना करावा लागला. ते 2019 मधे कॉंग्रेसचे प्राथमिक सदस्य झाले.
हिंदमाता प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याद्वारे नागरिकांसाठी महा ई सेवा केंद्र, मोफत रूग्णवाहीका, देवदासींच्या मुलांसाठी शिक्षण, आरोग्य तसेच इतर उपक्रम, शहरात वेगवेगळया भागात उद्भवलेल्या आपत्तीत मदतकार्य, शेतकऱ्यांना चारा वाटप, स्वयंरोजगार प्रशिक्षण असे शेकडो उपक्रम राबविले जात आहेत.
याशिवाय, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली असून, ती विशेष चर्चेची ठरली आहेत. त्यात, प्रामुख्याने महापालिकेत भ्रष्टाचारांच्या अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी मनसे स्टाईल केलेली अनेक आंदोलने चांगलीच गाजली.
शहरासह राज्यभरात जल्लोष
उपनगरांत ठिकठिकाणी डिजेचा दणदणाट
“नोटा’गिरी जोरात
दरम्यान, या निवडणुकीत आणखी एक नवीन विक्रम झाला आहे. धंगेकर आणि रासने यांच्यासह कसब्यातून इतर 14 उमेदवार रिंगणात होते. इतर सर्व उमेदवारांना एकत्रित मिळून 1268 मते मिळाली आहेत. तर 1397 मतदारांनी नोटा वापरला आहे. त्यामुळे 14 उमेदरवांची मते ही नोटापेक्षा कमी आहेत. त्यात, भाजपने ब्राह्मण समाजाला प्रतिनिधीत्व दिले नाही म्हणून निवडणुकीत हिंदू महासंघाच्या वतीने अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले आनंद दवे यांना 297 मते मिळाली आहेत.
हा विजय जनतेचा ः धंगेकर
माझा विजय म्हणजे “हू इज धंगेकर असे विचारणाऱ्यांना आता “ही इज धंगेकर…’ हे उत्तर मिळाले असेल, अशा भावना व्यक्त करत हा माझा नाही, तर हा विजय जनतेचा आहे. अशा भावना महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजयानंतर व्यक्त केल्या आहेत. धंगेकर म्हणाले की, हा विजय जनतेचा आहे. मी विजयाने हुरळून जाणारा कार्यकर्ता नाही. मी जनतेसाठी काम करणारा आहे. जनतेने आणि कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हाती घेतली होती.
हा भाजपचा गड नव्हता. ही निवडणूक माझ्यासाठी सोपी नव्हती. पण जनतेने ती हाती घेतली आणि माझा विजय सहज झाला. मी विजय नेहमी बघत राहिलो. मी आहे तसाच राहणार आहे. मला सर्व नेत्यांचे फोन आले. त्यांनी शुभेच्छा दिल्या. गिरिश बापटांना भेटणार. मला पहिल्या दिवसापासून विजयाची खात्री होती. त्यामुळे मी जिंकणारच याचा मला विश्वास होता. यापूर्वी या मतदारसंघात कधीही थेट आणि दुरंगी लढत झाली नाही. मात्र, पहिल्यांदाच दुरंगी निवडणूक झाल्याने मी विजयी झाला.