सातारा – कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाल्याबद्दल सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने कॉंग्रेस भवनासमोर नागरिकांना पेढे, साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
धंगेकर यांनी मतमोजणीच्या सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. दुपारी त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर कॉंग्रेसचे
जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सहकार विभागाचे सरचिटणीस मनोजकुमार तपासे, ऍड. दत्तात्रय धनावडे, ओबीसी विभागाचे अध्यक्ष जगन्नाथ कुंभार, प्रदेश प्रतिनिधी अन्वर पाशाखान, सुषमाराजे घोरपडे, संभाजी उत्तेकर, ग्राहक संरक्षणचे जिल्हाध्यक्ष आनंदा जाधव,
अशोकराव काळे, विजयराव मोरे, अमोल शिंदे, रणधीर गायकवाड, पिसाळ आदी उपस्थित होते. यावेळी नरेश देसाई म्हणाले, “”राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे देशातील वातावरण बदलत असून परिवर्तन सुरू झाले आहे. भाजपने दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या सर्व नेत्यांनी ताकद लावूनही कसबामधील जनतेने त्यांचा निकाल लावला आहे.” हा विजय कॉंग्रेस कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा आहे, असे तपासे यांनी सांगितले. यावेळी कॉंग्रेस भवनासमोरील रस्त्यावरील रिक्षाचालक, दुचाकीचालक व नागरिकांना पेढे व साखर वाटण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.