नवी दिल्ली – भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक पुढील महिन्यात तेलंगणची राजधानी हैदराबादमध्ये होणार आहे. त्यामुळे भाजपने आता मिशन साऊथ हाती घेतल्याचे मानले जात आहे.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचा प्रारंभ 2 जुलैला होईल. त्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा, पक्षाचे केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री सहभागी होतील. त्या बैठकीसाठी हैदराबादची निवड करण्यात आल्याने दक्षिणेकडील राज्यांत विस्तारण्याचा चंग भाजपने बांधल्याचे स्पष्ट होत आहे.
राष्ट्रीय स्तरावर भाजपला राजकीय आव्हान देण्यासाठी प्रादेशिक पक्षांची आघाडी स्थापण्याच्या उद्देशातून तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव सक्रिय झाले आहेत. त्यामुळेही राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीसाठी भाजपने हैदराबादची निवड करण्याच्या घडामोडीला महत्व आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुमारे पाच वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच देशाची राजधानी दिल्लीबाहेर होत आहे.
याआधी 2016 मध्ये केरळमध्ये पक्षाची बैठक झाली होती. केंद्रात 2014 मध्ये सत्तेवर आल्यानंतर भाजपची दक्षिणेकडील राज्यांत तिसरी कार्यकारिणी बैठक होत आहे. केरळच्या आधी कर्नाटकमध्ये 2015 या वर्षी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक झाली होती.