नवी दिल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सोमवारी दावा केला की भाजपने आपल्याला भाजप प्रवेशाची ऑफर दिली असून त्यांच्या पक्षात प्रवेश घेतल्यास आपल्यावरील सर्व खटले बंद करण्याची ऑफर देणारा संदेश या पक्षाकडून आपल्यापर्यंत पोहचवण्यात आला आहे. आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे ठासून सांगून सिसोदिया म्हणाले की,षडयंत्र रचून खोटे गुन्हा दाखल करणाऱ्या, भ्रष्ट लोकांपुढे मी कधीही झुकणार नाही.
दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेच्या संदर्भात केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने सिसोदिया आणि अन्य 15 लोकांच्या विरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांनी आज ट्विटरवर म्हटले आहे की, मला भाजपकडून संदेश मिळाला आहे – ‘आप’ सोडा आणि भाजपमध्ये जा. तुमच्याविरुद्ध सीबीआय आणि ईडीचे सर्व खटले बंद होतील याची आम्ही खात्री देऊ.
भाजपला माझे प्रत्युत्तर- मी महाराणा प्रताप यांचा वंशज आणि राजपूत आहे. मी शिरच्छेद करायला तयार आहे, पण कटकारस्थान आणि भ्रष्ट लोकांपुढे कधीच झुकणार नाही. माझ्यावरील सर्व खटले खोटे आहेत. तुम्हाला जे करायचे ते करा, असे त्यांनी हिंदी भाषेतील ट्विटमध्ये म्हटले आहे. सिसोदिया हे आज केजरीवालांबरोबर गुजरातच्या दौऱ्यावर गेले असून तेथे त्यांनी अहमदाबाद येथे एक पत्रकार परिषद घेऊन हाच दावा केला. ते म्हणाले की भाजपने मला मुख्यमंत्रीपदाचीहीं ऑफर दिली आहे.