- आमदार सुनील शेळके यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर धाड सत्र
वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी आमदार सुनील शेळके यांनी रविवारी (दि.21) कामशेत पोलीस ठाण्यावर बेधडक मोर्चा काढला होता. या मोर्चात भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केल्यानंतर मावळातील पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग ऍक्शन मोडवर आला असून रविवारपासून त्यांनी अवैधरीत्या गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या 12 अड्ड्यांसह 2 हॉटेलांवर कारवाई करत आरोपींना अटक केली आहेत. त्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने सहा पथके तयार केली आहेत.
यामध्ये कामशेत पोलिसांनी पाथरगाव, नाणे, कडधे, व कोथूर्णे येथील दारू भट्यांवर कारवाई करत 850 लिटर दारू जप्त करून 7 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी वाकसई, करंडोली व वरसोली या तीन ठिकाणच्या अवैध दारू धंद्यांवर कारवाई करत सुमारे 35 लिटर दारू जप्त केली आहे.तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने देखील मावळात 6 पथके तैनात करून डोंगरगाव येथील 2, वाकसई येथील 1 व टाकवे येथील 1 अशा एकूण 5 गावठी दारू भटट्यांवर कारवाई करत सुमारे 80 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी 3 आरोपींना अटक केली आहे. तसेच हॉटेलमध्ये अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या पूजा गावरान व तडका या दोन्ही हॉटेलवर देखील कारवाई केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक युवराज शिंदे यांनी दिली आहे.