नवी दिल्ली – भाजपने (BJP) बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) याचे आभार मानत कॉंग्रेसवर (Congress) निशाणा साधला. शाहरूखच्या सुपरहिट ठरलेल्या जवान (Jawan)या चित्रपटात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्रातील मागील भ्रष्ट यूपीए राजवटीचा पर्दाफाश करण्यात आल्याचा दावा भाजपने केला.
प्रचंड कमाई करणारा शाहरूखचा ‘जवान’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. त्या पार्श्वभूमीवर, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी सोशल मीडियावरून शाहरूखच्या चित्रपटाचा संदर्भ दिला. त्या चित्रपटाने वर्ष 2004 ते 2014 या कालावधीतील यूपीएच्या भ्रष्ट, धोरणात्मक पांगळेपणा आलेल्या राजवटीचे दर्शन घडवले असल्याचे त्यांनी म्हटले.
त्या चित्रपटात भ्रष्टाचाराबरोबरच सरकारी अनास्था, शेतकरी आत्महत्या, लष्करासाठी सदोष शस्त्रास्त्रे, निवासी भागांतील धोकादायक कारखाने आदी विषयांनाही स्पर्श करण्यात आला आहे.
कॉंग्रेसला लक्ष्य करण्यासाठी भाटिया यांनी कोळसा, 2 जी घोटाळ्यांचा उल्लेख केला. त्याउलट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे रेकॉर्ड स्वच्छ आहे. मोदी सरकारने पारदर्शकता, प्रामाणिकपणाचा अवलंब केला आहे, असेही त्यांनी म्हटले.
‘जवान’ बॉक्स ऑफिस कलेक्शन :
‘जवान’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पहिल्या दिवशी, चित्रपटाने भारतातील सर्व भाषांमध्ये 74.50 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने जगभरात 129.06 कोटींची कमाई करून हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात मोठ्या ओपनिंग डेचा साक्षीदार ठरला.
ट्रेड रिपोर्ट्सनुसार, 5 व्या दिवशी, 11 सप्टेंबर रोजी ‘जवान’ने भारतात 30 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे भारतातील एकूण कलेक्शन आता 316.16 कोटी रुपये झाले आहे. यापुढे ही चित्रपट आणखी दमदार कमाई करणार असल्याचं बोलण्यात येत आहे.