चेन्नई – पुदुच्चेरीत प्रचारासाठी भाजपकडून मतदारांच्या आधार डेटाचा अवैध वापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी गांभीर्याने तपास होण्याची गरज व्यक्त केली. तसेच, पुदुच्चेरी विधानसभा निवडणूक लांबणीवर टाकता येऊ शकेल का, अशी विचारणा निवडणूक आयोगाला केली.
केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या पुदुच्चेरीत विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान (6 एप्रिल) होणार आहे. मतदानाचा दिवस जवळ आला असतानाच भाजपवर करण्यात आलेल्या आरोपामुळे राजकीय सनसनाटी निर्माण झाली आहे. त्या आरोपाशी संबंधित जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. भाजपने अवैधपणे मतदारांचा आधार डेटा मिळवला. त्याच्या आधारे मोठ्या संख्येने व्हॉटस्ऍप ग्रुप्स बनवून प्रचार केला जात आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला.
आरोपाची गंभीर दखल घेऊन न्यायालयाने निवडणूक लांबणीवर टाकणे शक्य आहे का, असा सवाल निवडणूक आयोगाला केला. त्यावर केवळ आरोपांच्या आधारे निवडणूक लांबणीवर टाकता येऊ शकणार नाही, अशी भूमिका आयोगाने मांडली. कारणे दाखवा नोटीस बजावून भाजपकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले असल्याचेही आयोगाने नमूद केले. त्यानंतर न्यायालयाने चौकशी करून त्याविषयीचा अहवाल 31 मार्चला सादर करण्याचा आदेश निवडणूक आयोगाला दिला.