मुंबई – भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला घरीच आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक औषधोपचार व काळजी घेत आहे. अलीकडे माझ्या संपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी आपली चाचणी करून घ्यावी ही विनंती.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी बावनकुळे यांच्या नेतृत्वात रविवारी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलनात अनेक कार्यकर्ते सहभागी होते.