नोएडा – नॉयडातील फरारी भाजप नेता श्रीकांत त्यागी याला अखेर अटक करण्यात आली असून मंगळवारी त्याला मेरठमधून ताब्यात घेण्यात आले आहे. तो राहात असलेल्या हाउसिंग सोसायटीमध्ये एका महिलेला तो शिवीगाळ आणि मारहाण करताना दिसला होता. त्या प्रकरणी संबंधीत महिलेने आणि त्या सोसायटीतील नागरीकांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर तो फरारी झाला होता.
त्यागीच्या तीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यागी हा भाजपशी संबंधीत संघटनांचा पदाधिकारी होता असा त्याचा दावा होता पण भाजपने मात्र त्याच्याशी आमच्या पक्षाचा काहींही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
त्यागी हा ज्या सोसायटीत राहात होता तेथे तो मनमानी करीत होता. सोसायटीच्या आवारात आपल्या घरापुढे त्याने झाडे लावण्याचा प्रयत्न केला होता त्याला संबंधीत महिलेने विरोध केल्यानंतर त्याने या महिलेला शिवीगाळ व मारहाण करून तेथे दहशत माजवली होती.