नवी दिल्ली – दिल्लीतील एका व्यापाऱ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाने 2 कोटींचा गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा गंडा घालणारा भारतीय जनता पार्टीचाच एक स्थानिक नेता आहे. त्याने व त्याच्या मुलाने हा गंडा घातला आहे.
रेल्वेचे आणि अन्य प्रोजेक्ट मिळवून देण्याचा 100 कोटींचा करार करत त्यातील 2 कोटी रूपये अगाउ घेत संबंधित व्यापाऱ्याला फसवण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर व्यापाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रेल्वे प्रवासी सेवा समितीचे अध्यक्ष रमेश चंद्र रत्न आणि त्यांचा मुलगा ब्रजेश रत्न यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुमचे काम होऊन जाईल. तुम्ही टोकनचे 2 कोटी रूपये घेउन कृषक रोडवर या. एक तासात आपण अमित शहा यांच्याशी बोलू असे आपल्याला सांगण्यात आले असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तक्रारदार हॉटेल व्यवसायात असून त्याला रेल्वेतही काम सुरू करायचे होते.