नवी दिल्ली – दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या शिक्षण मॉडेलचे कौतुक करणारी एक स्टोरी न्युयॉर्क टाईम्स या दैनिकाने आपल्या पहिल्या पानावर छापली आहे. त्यावरून भाजपच्या काही नेत्यांनी ही बातमी पेड न्युज असल्याचा दावा केला होता. तथापि न्युयॉर्क टाईम्स या दैनिकाच्या प्रतिनिधीने या संबंधात एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ही बातमी पेड न्युज नसल्याचा खुलासा केला आहे.
न्युयॉर्क टाईम्सने आपल्या निवेदनातही म्हटले आहे की दिल्लीतील शिक्षण मॉडेलच्या संबंधातील आमची बातमी ही प्रत्यक्ष जागेवर जाऊन केलेली पहाणी आणि मूळ वस्तुस्थितीची शहानिशा करून छापली आहे. शिक्षण हा विषय आमच्या दैनिकाने गेल्या अनेक वर्षांपासून विशेष लक्ष घालून कव्हर केला आहे. आणि दिल्लीतील या मॉडेल विषयी आम्ही निष्पक्षपणे तेथील माहिती लोकांपुढे ठेवली आहे. आमची पत्रकारीता नेहमीच राजकारण व जाहीरातदारांच्या प्रभावाच्या बाहेरची असते. आमच्या बातम्या अन्य माध्यमे माहितीचा खरा स्त्रोत म्हणून छापत असतात असेही न्युयॉर्क टाईम्सच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आम आदमी पक्षाचे आमदार सौरव भारद्वाज यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या दाव्याची चांगलीच चिरफाड केली असून भाजपच्या अडाणी लोकांना विदेशातील वृत्तपत्रांच्या संबंधात काहींच माहिती नसल्याचे म्हटले आहे. न्युयॉर्क टाईम्स मध्ये जी बातमी आली आहे, तीच बातमी खलिज टाईम्स या दैनिकातही आल्याने ही पेड न्युज आहे असे भाजपच्या नेत्याने म्हटले आहे. पण न्युयॉर्क टाईम्स मध्ये आलेलेच वृत्त खलिज टाईम्सने छापले असून त्याखाली त्यांनी अत्यंत स्पष्टपणे न्युयॉर्क टाईम्सच्या सौजन्याने असे नमूद केले आहे.
न्युयॉर्क टाईम्सच्या वृत्तात ते वृत्त देणाऱ्या पत्रकाराचे नाव छापले गेले असून तेच नाव खलिज टाईम्सच्या वृत्तात आहे. यावरून तरी भाजपच्या अडाणी लोकांना यातील तथ्य लक्षात यायला हवे होते असा टोमणाही त्यांनी मारला आहे. भारद्वाज म्हणाले की, न्युयॉर्क टाईम्समध्ये ही बातमी आल्याचा मला जितका आनंद झाला नाहीं तितका आनंद भाजप नेत्यांना झालेल्या पोटदुखीतून झाला आहे.