बारामतीत भाजपकडून चाचपणी सुरू

पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी दौऱ्यावर

बारामती – महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवारी (दि. 8) बारामतीच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

बारामती विधानसभेसाठी अजित पवार यांच्याविरोधात कोणता उमेदवार रिंगणात उतरवायचा याची चाचपणी भाजपकडून सुरू आहे. त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे. पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर पाटील पहिल्यांदाच बारामतीला येत असून दुष्काळी परिस्थितीचा देखील आढावा घेणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाची मोर्चेबांधणी पालकमंत्री पाटील यांनी केली होती. मात्र, भाजपचा उमेदवार निवडून देण्यात त्यांना यश आले नाही. असे असले तरी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना देत पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. त्यानुसार रणनीति आखली जात आहे. त्यानुसार पालकमंत्री दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. शहरातील बारामती हॉस्पिटलला पाटील भेट देणार आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील व बारामती हॉस्पिटल संदर्भात असलेल्या समस्यांबाबत डॉक्‍टरांशी ते चर्चा करणार आहेत. त्यानंतर भाजप नेते व कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. रविवारी (दि. 7) ते बारामती येथे मुक्‍कामी असल्याची माहिती भाजपचे नेते तसेच चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय अविनाश मोटे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.