नवी दिल्ली : थेट महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे भाजपचे नेते अनंतकुमार हेगडे यांना महागात पडण्याची शक्यता आहे. त्या वक्तव्यामुळे हेगडे यांच्यावर पक्षाचे केंद्रीय नेतृत्व नाराज झाले आहे. कारणे दाखवा नोटीस बजावून हेगडे यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्याशिवाय, संसदेचे अधिवेशनही सुरू आहे.
अशातच आक्षेपार्ह टिप्पणी करून हेगडे यांनी भाजपला घेरण्याची आयतीच संधी विरोधकांना मिळवून दिली आहे. त्यामुळे हेगडे यांना पक्षाकडून नाराजी कळवण्यात आली आहे. महात्मा गांधी यांचा कुठल्या प्रकारचा अवमान खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे.
वादग्रस्त वक्तव्याबद्दल हेगडे यांना माफी मागण्याचा आदेश दिला जाऊ शकतो. त्यांनी याआधीही अनेकदा काही-बाही वक्तव्ये करून वाद ओढवून घेतले. मात्र, सध्याची राजकीय स्थिती पाहता यावेळी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य हेगडे यांना महाग पडू शकते, असेच संकेत मिळत आहेत.