वर्ध्यात शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

वर्धा – वर्ध्यातील हिंगणघाटात शिक्षिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्‍कादायक घटना घडली. यात भाजलेल्या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पीडित तरुणी एका महाविद्यालयात तासिका तत्वावर शिकवण्याचे काम करत असल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी आज सकाळी कॉलेजमध्ये जात असताना नंदोरी चौकापासून काही अंतरावर दुचाकीवर आलेल्या युवकाने तिच्या अंगावर पेट्रोल फेकले आणि तिच्या हातात पेटवलेला टेंभा फेकून तिला पेटवून दिले. त्यानंतर लगेचच त्याने घटनास्थळवरुन पळ काढला.

युवतीने आरडाओरडा करताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत तिच्या अंगावर पाणी टाकून तिचे प्राण वाचवले. त्यानंतर तिच्यावर जवळील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले आणि नंतर तिला नागपूरच्या रुग्णालयात दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विक्की नगराळे आणि पीडित तरुणी यांच्यात तीन महिन्यांपूर्वीही बसमध्ये वाद झाला होता. पीडित तरुणीची इच्छा नसताना विक्की तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी तरुणीने याबाबत आपल्या कुटुंबियांना कळवले होते. आरोपी विक्कीने शांत डोक्‍याने नियोजन करुन तरुणीवर हल्ला केल्याचा संशय असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.