चिकन, अंड्यांच्या भावात घट : करोनानंतर नव्या साथीने कंबरडे मोडणार
– विजयकुमार कुलकर्णी
पुणे – “चिकन खाल्याने करोना होतो,’ अशी अफवा काही महिन्यांपूर्वी पसरली होती. त्यावेळी खवय्यांनी भीतीपोती चिकनकडे पाठ फिरवली. त्यावेळी पोल्ट्री व्यावसायिकांना नुकसानीला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आता बर्ड फ्लूच्या भीतीने पुन्हा नागरिक चिकन आणि अंडी खाणे टाळत आहेत.
परिणामी, शहरात चिकन आणि अंडीची मागणी घटली आहे. त्यामुळे चिकनच्या भावात आठवड्याभरात घाऊक बाजारात किलोमागे 10 ते 20 रुपये, तर, गावरान आणि इंग्लिश अंड्याच्या भावात शेकड्यामागे अनुक्रमे 10 ते 20 रुपये आणि 20 ते 30 रुपयांनी घट झाली आहे.
मार्च 2020 पासून करोनाची भयंकर साथ सुरू आहे. सुरूवातीला तर “चिकन खाल्याने करोना होतो,’ असा समजच निर्माण झाला होता. त्यावेळी नेहमीच्या तुलनेत निम्म्या भावात कोंबडी आणि अंडी विक्री होत होती. त्यामुळे व्यावसायिकांसह जोडधंदा करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यानंतर “ही अफवा आहे,’ असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी चिकन आणि अंडी सेवन सुरूवात केली. आता बर्ड फ्लूची साथ आली आहे. केरळमध्ये कावळा आणि इतर पक्ष्यांमध्ये ही साथ आढळली आहे. तर, हरियाणामध्ये काही कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात “रेड अलर्ट’ जारी केला आहे.
त्यामुळे नेहमीच्या तुलनेत चिकनची सुमारे 20 टक्के मागणी घटल्याचे चिकनचे व्यापारी रुपेश परदेशी यांनी सांगितले. ते म्हणाले, “चिकनची आवक नेहमीच्या तुलनेत आहे. मात्र, मागणी कमी असल्याने भावात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात चिकनला घाऊक बाजारात किलोला 190 ते 200 रुपये भाव मिळत होता. तो आता 170 ते 180 रुपये मिळत आहे. गावरान आणि इंग्लिश अंड्यांच्या भावातही मागणीअभावी घसरण झाली आहे. गावरान आणि इंग्लिश अंड्याला शेकड्याला अनुक्रमे 850 आणि 510 रुपये भाव मिळत आहे.
महाराष्ट्रात बर्ड फ्लू आढळलेला नाही. पुण्यासह इतर ठिकाणी परराज्यांतून चिकनची आवक होत नाही. अंडी मात्र हैदराबाद आणि कर्नाटकातून काही प्रमाणात येतात. मात्र, तेथे बर्ड फ्लू नाही. त्यामुळे नागरिकांनी चिकन, अंडी खाताना भीती बागळण्याचे कारण नाही. नागरिकांनी पूर्वीप्रमाणेच अंडी आणि चिकनचे सेवन करावे.
– रुपेश परदेशी, चिकन आणि अंडी व्यापारी.