लंडन : कोरोनाच्या नव्या विषाणूने युनायटेड किंग्डममध्ये अक्षरशः हाहाकार घातला आहे. अशा परिस्थितीत देशाच्या पंतप्रधानांनी सक्तीच्या लॉकडाऊनची घोषणाही केली. रोज कोरोनाचे झपाट्याने वाढणारे संकट आता युकेमध्ये आणखी गंभीर वळण घेताना दिसत आहे. लंडनमध्ये याचेच थेट पडसाद पाहायला मिळत असून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ज्यामुळे लंडनचे महापौर सादिक खान यांनी तिथे परिस्थिती पाहता Major Incident ची घोषणा केली आहे.
एप्रिल महिन्याच्या परिस्थितीपेक्षाही जवळपास 35 टक्के जास्त रुग्ण सध्याच्या घडीला इथे आढळले आहेत. अधिकृत आकडेवारी पाहिल्यास येथील एका पालिका क्षेत्रात किंवा borough मध्ये आठवड्यास 5 हजारहून जास्त नवे कोरोनाबाधित सापडत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार मागील आठवड्यात इथं 6 हजार कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही सर्व परिस्थिती पाहता शुक्रवारी सादिक खान यांच्या ट्विटनं सर्वांच्या मनात असणारी भीती आणखी वाढवली. त्यांनी ट्विट करत लिहिलं, ‘मी लंडनमध्ये Major Incident ची घोषणा करत आहे. कारण, कोरोनाच्या संकटानं आता धोक्याची परिसीमा गाठली आहे.
लंडनमधील दर 30 नागरिकांमागे एका नागरिकाला कोरोनाची लागण झाली आहे. आपण, आताच तातडीनं पावलं उचलली नाहीत, तर आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढून मृतांचा आक़डा वाढेल’. असेही त्यांनी म्हटले आहे. लंडनमध्ये कोरोना नियंत्रणाबाहेर जात असल्याची बाब खान यांनी मांडलेल्या आकडेवारीतून समोर येत आहे. जिथं मॅकेनिकल व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांची संख्या 42 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. कोरोनाने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे मृतांच्या आकड्यात भर पडण्याची भीतीही त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केली.