बर्ड फ्लूचा संसर्ग तूर्तास नाही

पक्ष्यांच्या नमुने तपासणीअंती पशुसंवर्धन विभागाचा दावा

पुणे – वन्य व स्थलांतरित पक्षी, कावळा किंवा कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग आढळलेला नाही. या रोगामुळे आतापर्यंत एखाद्या पक्ष्याचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे कुक्कुटपालक, अंडी व मांसाहारी नागरिकांनी घाबरण्याची परिस्थिती नाही, असा दावा पशुसंवर्धन विभागाने केला आहे. दरम्यान, काही पक्ष्यांमध्ये तशी काही लक्षणे आढळल्याच तातडीने जवळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बर्ड फ्लू सर्व्हेक्षण कार्यक्रमाअंतर्गत पक्ष्यांच्या घशातील द्रवांचे नमुने, विष्ठेचे नमुने तसेच रक्तजल नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात येतात. यांची तपासणी पश्‍चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळेमध्ये पाच राज्यांसाठी पशुरोग निदानाच्या शीर्षस्थ प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात येतात. 

सन 2020-21 मध्ये या संस्थेने राज्यातील एकूण 1,715 विष्ठा नमुने, 1,913 रक्तजल नमुने 1,549 घशातील द्रवांच्या नमुन्यांची तपासणी आरटी-पीसीआर आणि एलायझा या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेली आहे.

तपासणीअंती वरील सर्व नमुने बर्ड फ्लू नकारार्थी आढळून आले आहे. दरम्यान, कुक्कुटपालन करणाऱ्या ठिकाणी बर्ड फ्लूचे सर्व्हेक्षण अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आवश्‍यक सूचना पशुसंवर्धन आयुक्तालयाने दिल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.