…अबब “म्हाडा’च्या 5,600 घरांसाठी तब्बल 53 हजार अर्ज; ‘या’ दिवशी काढणार सोडत

पुणे  – “म्हाडा’ अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या 5,600 घरांसाठी आतापर्यंत तब्बल 53 हजार जणांनी अर्ज भरले आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटचे पाच दिवस शिल्लक आहेत. अर्जासाठी काही दिवस उरले असल्याने इच्छुकांनी तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन “म्हाडा’चे पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी पत्रकार परिषदेत केले.

 

 

माने म्हणाले, “पुणे मंडळाची पाचवी ऑनलाइन सोडत दि. 22 रोजी होणार आहे. ही आतापर्यंतची सर्वांत मोठी सोडत असेल. “म्हाडा’च्या संकेतस्थळावर आजपर्यंत 1 लाख 91 हजार नागरिकांनी भेट दिली. त्यापैकी 1 लाख 16 हजार 330 जणांनी नोंदणी केली. “म्हाडा’ची ऑनलाइन सोडत दि.22 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता कॅम्प येथील नेहरू मेमोरियल हॉल येथे होणार आहे.

 

 

या सोडतीचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री सतेज पाटील, प्रधान सचिव एस. व्ही. श्रीनिवास आणि उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर उपस्थित राहणार आहे. घरांची लॉटरी लागल्यानंतर विजेत्या उमेदवारास ही माहिती एसएमएस अथवा ई-मेलद्वारे अवघ्या तासाभरात मिळणार आहे. त्यानंतर कागदपत्र पूर्ततेसाठी “म्हाडा’ कार्यालयात शिबिर आयोजित केले जाणार असून, एक खिडकी योजना राबविली जाणार आहे.’

 

 

 

“म्हाडा’ची ही सोडत संपूर्णपणे पारदर्शी आणि ऑनलाइन असून, प्रशासनाने कोणीही एजंट नेमलेला नाही. त्यामुळे अर्जदारांनी कोणावरही विश्वास ठेवू नये. याबाबत कोणाशीही आर्थिक व्यवहार करू नयेत.

– नितीन माने, मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.