‘या’ 3 राज्यांमध्ये गरीबांची संख्या जास्त

नवी दिल्ली – निती आयोगाने विविध राज्यांच्या उत्पन्नाची माहिती घेऊन तयार केलेल्या अहवालामध्ये बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेश ही सर्वात गरीब राज्य असल्याचे दिसून आले आहे. अहवालातील माहितीनुसार बिहार मधील 52 टक्के लोक गरीब आहेत. झारखंड मधील 42 टक्के तर उत्तर प्रदेशातील 37 टक्के लोक गरीब आहेत. मध्यप्रदेशातील गरीब लोकांची संख्या 36 टक्के आहे तर मेघालयातील गरीब लोकांची संख्या 32 टक्के आहे.

बिहारमध्ये सर्वाधिक कुपोषित व्यक्ती आहेत. त्यानंतर झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडचा क्रमांक लागतो. अहवाल तयार करताना संबंधित राज्यातील आरोग्य, शिक्षण, ऊर्जा, पिण्याचे पाणी, घर बांधणी, बॅंक खाती इत्यादीचा विचार करण्यात आला आहे.

केरळ, गोवा, सिक्कीम, तामिळनाडू, पंजाब या राज्यातील गरिबांची लोकसंख्या सहा टक्‍क्‍यापेक्षा कमी असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल सादर करताना निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सांगितले की विविध राज्यातील आवश्‍यक माहिती संकलित करून हा अहवाल तयार केला आहे. त्यामुळे त्या राज्यातील गरिबी कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला आवश्‍यक ते प्रयत्न करण्यासाठी हा अहवाल उपयोगी पडणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.