मुझफ्फरपूर – बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील बेला औद्योगिक परिसरात असलेल्या कुरकुरे कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन सहा जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच जिल्ह्याचे डीएम आणि एसपी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अपघातात काही लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक जखमी आहेत. सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली, अशी माहिती जिल्हा दंडाधिकारी प्रणव कुमार यांनी दिली आहे.
स्फोट इतका मोठा होता की त्याचा आवाज एक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. लोकांना भूकंपाची भीती वाटल्याने ते घरातून बाहेर पडले आणि रस्त्यावर आले. मात्र, नंतर कारखान्यातून धूर निघताना दिसला. त्याचवेळी किंचाळण्याचा आवाज आला. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून जखमींना मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती तीव्र शोक व्यक्त केला आहे. यासोबतच मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांचे सानुग्रह अनुदान देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अपघातातील जखमींना योग्य ते उपचार देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून पाटण्याहून एक टीम पाठवण्यात आली आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे.