कराड (प्रतिनिधी) – वाठार (ता. कराड) येथे पुणे-बंगळुरु महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला. आज रविवारी 26 रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली.
वाहनाच्या धडकेत जखमी झालेला बिबट्या रविवारी मृतावस्थेत आढळला. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वन विभागाला कळवल्यानंतर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील महामार्गावर वाठारजवळ एका बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्या गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने महामार्गावरील प्रवाशांसह स्थानिक ग्रामस्थांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
स्थानिक ग्रामस्थांनी कळवल्यानंतर वन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचानामा केला. तसेच घटनेतील मृत बिबट्या हा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर मृत बिबट्यावर वनविभागाच्या हद्दीत अंत्यसंस्कार करण्यात आले.