पाटणा -बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर रविवारी एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. हा धक्कादायक प्रकार पाटण्यातील बख्तियारपूरमध्ये घडला.मात्र या धक्काबुक्कीत नितीश कुमार यांना कोणतीही दुखापत झाली नाही. सध्या पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.या व्यक्तीची मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बख्तियारपूर येथे पोहोचले होते. यादरम्यान ते एका मूर्तीला हार घालण्यासाठी पुढे गेले असता त्याचवेळी जमावातील एका व्यक्तीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. मात्र त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या जवानांनी लगेच या अज्ञात हल्लेखोराला ताब्यात घेतले.
नेमका कसा हल्ला झाला?
बख्तियारपूरमध्ये एका मूर्तीला हार अर्पण करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर मागील बाजूनं आलेल्या तरुणानं त्यांच्यावर हल्ला केला. नितीश कुमार एकटेच त्या मूर्तीला हार अर्पण करण्यासाठी पुढं गेले होते. सुरक्षा रक्षंकांसारखी कपडे घातलेला व्यक्ती त्यांच्या मागोमाग गेला आणि त्यानं नितीश कुमार यांच्यावर हल्ला केला. या सर्व प्रकारामुळं तिथं खळबळ उडाली. वेळीच सुरक्षा रक्षक सावधान झाल्यानं नितीशकुमार यांना हल्लेखोर काही करु शकला नाही.
नितीश कुमार यांच्यावर यापूर्वी हल्ल्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर यापूर्वी देखील हल्ला झाला होता. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तो हल्ला झाला होता. मधुबनी जिल्ह्यातील प्रचार सभेत एका व्यक्तीनं नितीशकुमार यांच्या दिशेनं कांदे आणि वीट फेकली होती. मात्र, त्यावेळी सुरक्षा रक्षकानं त्यांचा जीव वाचवला होता.