पीवायसीची योजना यशस्वी
पुणे – क्रिकेट प्रशिक्षणाचा ऑनलाइन उपक्रम सुरू करण्याचा मान मिळविणारा पहिला क्लब ठरण्याची संधी पीवायसी हिंदू जिमखाना क्लबने साधली आहे. आधुनिक काळातील प्रशिक्षण तंत्र आणि अत्याधुनिक कोचिंगचा समग्र ढाचा याचा वापर करून क्रिकेट प्रशिक्षणाचा विकास घडविणारा पीवायसी हिंदू जिमखाना हा पुण्यातील आघाडीचा क्लब आहे.
केवळ पुण्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील यशस्वी आणि सर्वात भव्य अशी प्रशिक्षण योजना राबविण्याचा मान पीवायसी हिंदू जिमखान्याकडे जातो. सध्याच्या काळाला अनुसरून सर्वांना अतिशय परवडणारी प्रशिक्षण योजना तयार करण्याची गरज आम्हाला वाटली त्यातूनच या ऑनलाइनप्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली.
उदयोन्मुख व युवा खेळाडू सध्याच्या काळात आपापल्या घरातच अडकून पडल्यामुळे अतिशय पायाभूत स्तरापासून ते उच्च स्तरापर्यंत क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्याची संधी त्यांना मिळवून देणे गरजेचे होते. ऑनलाईन प्रशिक्षण ही संकल्पना काळाची गरजच ठरली आहे, असे पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव आनंद परांजपे यांनी सांगितले.
या प्रशिक्षण योजनेत पीवायसीच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, माजी रणजीपटू चारुदत्त कुलकर्णी, इंद्रजीत कामठेकर व पराग शहाणे यांनी ऑनलाइन माध्यमातून खेळाडूंना मार्गदर्शन केले. या योजनेचे मुख्य प्रशिक्षक निरंजन गोडबोले असून क्रिकेट विभागाचे संचालक रणजीत
पांडे यांनी राज्याचे प्रतिनिधित्व करत असलेल्या खेळाडूंना मार्गदर्शन केले.