नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमारविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. अखेर सुशील कुमारला अटक करण्यात आली आहे. माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन सागर धनखडच्या मृत्यू प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप सुशील कुमारवर आहे.
सुशील कुमारवर एक लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आले होते . सुशील कुमार परदेशात पसार झाला असावा असा संशय पोलिसांना होता. याच पार्श्वभूमीवर देशाच्या सर्व विमानतळांवर सुशील संदर्भात माहिती देण्यात आली होती.
छत्रसाल स्टेडियमवर ४ मेच्या रात्री झालेल्या मारहाणीच्या घटनेत २३ वर्षीय कनिष्ठ राष्ट्रीय विजेता कुस्तीपटू सागर राणाची हत्या झाली, तर सोनू आणि अमित कुमार जखमी झाले. या प्रकरणी सुशील आणि त्याच्या नऊ साथीदारांचा दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू होता.
सुशील कुमारने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते, मात्र हत्या, अपहरण आणि गुन्हेगारी कट अशा प्रकारचे आरोप सुशीलवर असल्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जगदीश कुमार यांनी सुशीलचा जामीन नाकारला होता.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ५ मेपासूनच सुशील कुमारच्या शोध सुरू केला होता. कारण मृत्यूची बातमी कळाल्यानंतरच सुशील कुमार घरातून फरार झाला होता, अशी माहिती पोलिसांनी यापूर्वी दिली होती. याप्रकरणी सुशील कुमारविरोधात काही सीसीटीव्ही फुटेजही सापडले होते. सुशील कुमारला अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलीस विशेष सेलचे आयुक्त नीरज ठाकूर यांनी दिली आहे.
मारहाण आणि हत्या झालेल्या छत्रसाल स्टेडियमच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुशील कुमार आपल्या २० ते २५ साथीदारांसह सागर राणा आणि दोन अन्य व्यक्तींना मारहाण करताना दिसून आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुशील कुमार सागर आणि अन्य दोन व्यक्तींना हॉकी स्टिकने मारहाण करताना करत असल्याचे दिसत असून, फॉरेन्सिक सायन्स लॅबनेही हा व्हिडीओही खरा असल्याचे म्हटलेले आहे.