मोठी बातमी ! शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी शरद पवारांसह मुख्यमंत्री उतरणार रस्त्यावर

येत्या आठवड्यात कृषी कायद्याविरोधात राज्य सरकार घेणार आक्रमक भूमिका

मुंबई : केंद्र सरकारने तयार केलेल्या नव्या कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर जवळपास २ महिन्यांपासून शेतकऱ्याचे आंदोलन सुरु आहे. आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये आतापर्यंत चर्चेच्या 9 फेऱ्या झाल्या आहेत. मात्र त्या निष्फळ ठरल्या. त्याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. कारण येत्या आठवड्यात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रस्त्यावर उतरणार असल्याची महत्वाची माहिती समोर अली आहेत.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध येत्या आठवड्यात स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार आहेत. याविषयीची माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री आणि राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. केंद्राच्या तिनही कृषी कायद्याविरोधात देशातील सर्व विरोधीपक्ष एकत्र आहेत. तिनही कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने सध्या स्थगिती दिली आहे. लोकशाहीत सरकारला कायदे रद्द करण्याचा अधिकार आहे. आज ना उद्या केंद्र सरकारला हे कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील,

शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत कृषी कायद्याला विरोध दर्शवला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनीही आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकारवर सातत्याने टीकास्त्र डागले आहे. केंद्र सरकारला कृषी कायदे परत घ्यावेच लागतील, असा ठाम विश्वासही राहुल गांधी यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रात खुद्द मुख्यमंत्री आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार असल्यानं कृषी कायद्याविरोधातील आंदोलन अधिक आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये 15 जानेवारी रोजी पार पडलेली 9 वी बैठकही निष्फळ ठरली आहे. बैठकीत कृषी कायद्यावर तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांनी तिन्ही कायदे रद्द झाल्याशिवाय आंदोलनामधून माघार नाही, अशी ठाम भूमिका घेतलेली आहे. तर दुसरीकडे सरकारही मागे हटण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता शेतकरी आणि केंद्र सरकारमधील पुढील बैठक 19 जानेवारीला दुपारी 12 वाजता होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.