नवी दिल्ली – नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारीवरून राज्यातील राजकारण तापले आहे. पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर करून आणि एबी फॉर्म देऊनही डॉ. सुधीर तांबे यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली. तसेच मुलाच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यामुळे कॉंग्रेस हायकमांडकडून डॉ. तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. डॉ. तांबे आणि युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या विरोधात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेताना यासंदर्भातील अहवाल कॉंग्रेस हायकमांडला पाठवला होता.
पक्षविरोधी भूमिका घेऊन शिस्त मोडल्याने ही डॉ. तांबे यांच्यावर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मान्यतेने शिस्तपाल समितीने निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच त्यांच्याविरोधात चौकशी प्रलंबित असल्याचेही सांगण्यात आले आहे. जोपर्यंत संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत डॉ. तांबेंचे निलंबन कायम राहणार आहे. कॉंग्रेसने डॉ. तांबेंवरील निलंबनाच्या कारवाईचे पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे.
बंडखोराला पाठींबा नाही- पटोले
डॉ. सुधीर तांबे यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्ज न भरता मुलाला अर्ज भरायला लावला. ही पक्षासोबत फसवेगिरी आहे. तसेच सत्यजीत तांबे यांनी आपण भाजपचा पाठिंबा घेणार असल्याचे विधान केले. तांबे पिता-पुत्रांनी पक्षासोबत मोठा दगाफटका केला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. तसेच नाशिकमध्ये जे काही घडले, ते हायकमांडला कळवले होते. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच बंडखोर उमेदवाराला कॉंग्रेस कधीही पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.