पुणे – कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पाच स्तरांत राज्यातील जिल्ह्यांची विभागणी केली होती. पाॅझिटिव्ही रेट व ऑक्सिजन बेड उपलब्धतेनुसार जिल्ह्याचा समावेश वेगवेगळ्या स्तरात करण्यात आला होता. अनेक जिल्हे पूर्णपणे अनलाॅक करण्यात आले होते. यामुळे कोरोना काळात थांबलेल्या जिल्ह्यातील अर्थचक्राला गेल्या काही दिवसांत नव्याने उभारी मिळाली.
मात्र, गेल्या काही दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’चा धोका उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याअनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या वरच ठेवण्याचा निर्णय 25 जूनरोजी घेतला आहे. यासंबंधीची नवी नियमावली 28 जूनपासून पुणे महानगरपालिका क्षेत्रात लागू होणार आहे, असे सुधारीत आदेश महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
– असे असतील नवीन नियम
1) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने दररोज दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.
2) अत्यावश्यक दुकानाव्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.
3) माॅल, सिनेमागृह, नाट्यगृह, संपूर्णत: बंद.
4) रेस्टाॅरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. दुपारी 4 नंतर तसेच शनिवार व रविवार फक्त पार्सल सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहतील.
5) लोकल ट्रेनमधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी, शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा, बंदरे सेवा यांच्या कर्मचाऱ्यांना प्रवास करणेस परवानगी राहील.
6) पुणे मनपा क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे (उद्याने), खुली मैदाने, चालणे व सायकलिंग सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरु राहतील.
7) सुट देण्यात आलेल्या आस्थापना\सेवा व्यतिरिक्त सर्व खाजगी कार्यालये कामाचे दिवशी 50 टक्के कर्मचारी क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवातील कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
8) आऊटडोअर स्पोर्ट्स सकाळी 5 ते 9 या वेळेत सुरु राहतील.
9) सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, व मनोरंजन कार्यक्रम यास 50 लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत परवानगी.
10) मनपा क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद. दैनंदिन पूजा\अर्जनासाठी परवानगी.
11) करोनाचे सर्व नियम पाळून लग्न समारंभ जास्तित जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी.
12) अंत्यसंस्कार, दशक्रिया विधा यांसाठी 20 लोकाच्या उपस्थितीत करण्यास परवानगी.
13) कृषी संबंधित दुकाने आणि त्यासाठी संबंधित आस्थापना, कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाची विक्री दुपारी 4 वाजेपर्यंत.
14) ई-काॅमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याककरिता परवानगी.
15) पुणे मनपा हद्दीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास (जमावबंदी) प्रतिबंद राहील तसेच सायंकाळी 5 नंतर (अत्यावश्यक सेवा वगळता) संचारबंदी लागू राहील.
16) व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, 50 टक्के क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार रविवार पूर्णत: बंद राहतील. त्या ठिकाणी एसी वापरता येणार नाही.
17) पीएमपीएमएल 50 टक्के क्षमतेने धावणार.
18) माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना व त्यामध्ये जास्तीत जास्त 3 व्यक्ती यांना परवानगी.
19) मद्यविक्री दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार आणि रविवारी होम डिलिव्हरी सुरु राहील.