नवी दिल्ली : सध्या कर्नाटकात निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा आणि आयकर विभाग हे नेहमी सर्तक राहतात. दरम्यान, आयकर विभागाने याच पार्श्वभूमीवर मोठी कारवाई केली आहे. आता कर्नाटकात सत्ताधारी भाजप आमदाराकडे मोठी रक्कम सापडली असून या प्रकरणी त्यांच्यांवर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.
कर्नाटकातील रामदुर्गचे भाजप उमेदवार चिक्करेवन्ना यांच्याशी संबंधित गाडीतुन एक कोटी 54 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी ही रोकड केली जप्त केली असून अनधिकृत रोकड प्रकरणी चिक्करेवन्ना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्नाटकामधील रामदुर्गचे भाजप उमेदवार चिक्करेवन्ना यांच्याशी संबंधित गाडीत कोट्यवधींची रक्कम सापडल्यानंतर आयकर विभागाने कारवाई सुरु केली आहे. ही रक्कम कुठून आली आणि कुठे जात होती, ही माहिती पोलिसांकडून घेतली जात असताना हा काळा पैसा आहे का? याचा शोध आयकर विभाग घेत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर रोकड सत्ताधारी आमदाराकडे सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
कर्नाटक निवडणूक सध्या जवळ येत आहे त्यातच अनधिकृत रक्कम मोठ्या प्रमाणावर सापडत आहे. नुकतेच याबाबत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढले होते. त्यानुसार कर्नाटकात केवळ आठ दिवसांत 69.36 कोटी रुपये रोख, दारू आणि इतर साहित्य जप्त केल्याचे म्हटले होते.