मुंबई – अभिनेत्री प्रियांका चोप्राने सिनेइंडस्ट्रीत मोठे नाव कमावले आहे. बॉलीवूडमध्ये यश मिळवल्यानंतर तिने हॉलीवूडमध्ये अप्रतिम काम केले. मात्र अनेकदा प्रियांकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. काही दिवसांपूर्वी तिने ‘RRR’ या चित्रपटाला तमिळ चित्रपट म्हटलं होतं. यावरून तिला ट्रोल करण्यात आले होते. यावर आता प्रियांकाने एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिले आहे.
एका मुलाखतीत बोलताना प्रियांका म्हणाली की, “मी जे काही करते, लोक नेहमी त्यात काहीतरी दोष शोधण्याचा प्रयत्न करतात. मला वाटते की लोकांना त्याचा आनंद होतो. पूर्वी मी मोकळेपणाने बोलायचे. पण आता मी विचारपूर्वक बोलते, कारण मी माझ्या कुटुंबाचा विचार करते. आयुष्यात तुम्ही जितके पुढे जाता तितके लोक तुम्हाला खाली आणण्याचा प्रयत्न करतात. पण यादरम्यान मला माझे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांचे प्रेम आणि पाठिंबा मिळाला. मला त्यांच्यावर लक्ष केंद्रित करायला आवडते, “असे म्हणत प्रियांकाने ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले आहे.
ऑस्कर जिंकल्याबद्दल RRR चित्रपटाच्या निर्मात्यांचे प्रियांकाने अभिनंदन केले होते. त्यानंतर डॅक्स शेपर्डच्या ‘आर्मचेअर एक्सपर्ट’ या पॉडकास्टमध्ये मुलाखतीदरम्यान प्रियांकाने ‘आरआरआर’ हा तमिळ चित्रपट असल्याचा उल्लेख केला होता. येथे होस्ट डॅक्सने RRR ला बॉलीवूड चित्रपट म्हटले. यावर प्रियांकाने हा तमिळ चित्रपट असल्याचे सांगितले. तिच्या या उत्तरामुळे प्रियांका चोप्राला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. ‘आरआरआर’ हा तेलुगू चित्रपट आहे.
दरम्यान, राजामौली दिग्दर्शित आरआरआर हा चित्रपट 24 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला होता. ज्यु. एनटीआर व राम चरण मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने केवळ देशभरात नाही तर जगभरात डंका वाजवला होता. ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ या गाण्याची क्रेझ आजही कायम आहे. आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने बेस्ट ओरिजनल ऑस्करचा पुरस्कार पटकावला आहे. हिंदीसह काही दाक्षिणात्य भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.