मुंबई – बृहमुंबई महापालिकेने विविध खात्यात झालेल्या भ्रष्टाचारामध्ये चौकशीअंती दोषी ठरलेल्या 55 कर्मचाऱ्यांना सेवेतून तडकाफडकी बडतर्फ केले आहे. तसेच, 134 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. याद्वारे पालिकेत कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसल्याचा संदेश त्यांनी दिला आहे.
मुंबई महापालिकेत गेल्या काही वर्षात रस्ते, शैक्षणिक साहित्य खरेदी, कीटकनाशक खरेदी, मूषक संहार, भंगार विक्री, टीडीआर, भूसंपादन, शालेय पोषण आहार, टॅब खरेदी, अनधिकृत बांधकामे आदी बाबतीत भ्रष्टाचार, घोटाळा झाल्याचे आरोप विरोधी व सत्ताधारी पक्षाने केले होते.
चौकशीत काहीजण निर्दोष सुटले तर अनेकजण दोषी आढळून आले. आयुक्त डॉ.इकबाल चहल यांच्या आदेशानुसार, भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध झालेले 55 कर्मचारी बडतर्फ तर सदरच्या गुन्ह्याची नोंद झालेले 53 व अन्य फौजदारी प्रकरणी गुन्हा नोंद झालेले 81 याप्रमाणे एकूण 134 कर्मचारी निलंबित केले आहेत.