नवी दिल्ली – वर्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्षाहून अधिक कालावधी बाकी आहे. यापूर्वी, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने एका अहवालात सांगितले आहे की 2009 ते 2019 लोकसभा निवडणुकीदरम्यान सलग तीन वेळा निवडून आलेल्या 71 खासदारांच्या सरासरी मालमत्तेत 286 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये प्रत्येक खासदाराच्या मालमत्तेत सरासरी 17.59 कोटींची वाढ झाली आहे.
वर्ष 2009 मध्ये अपक्षांसह विविध पक्षांनी मैदानात उतरवलेल्या या 71 खासदारांची सरासरी मालमत्ता 6.15 कोटी रुपये होती. पण 2014 मध्ये पुन्हा निवडून आलेल्या या खासदारांची सरासरी संपत्ती 16.23 कोटी रुपये झाली. गेल्या निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर 2019 च्या 71 खासदारांची सरासरी संपत्ती 23.75 कोटी रुपये होती.
ज्या खासदारांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे, त्यात भाजपचे सहा खासदार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिरोमणी अकाली दल, बीजेडी आणि एआययूडीएफचा प्रत्येकी एक खासदार पहिल्या दहामध्ये आहे. भटिंडा मतदारसंघातून शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल आघाडीवर आहेत. हरसिमरत कौर बादल यांच्या संपत्तीत गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 157.68 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. वर्ष 2009 मध्ये बादल यांची संपत्ती 60.31 कोटी रुपये होती, जी 2019 मध्ये वाढून 217.99 कोटी रुपये झाली.
या यादीत दुसरे नाव शरद पवार यांच्या कन्या आणि बारामतीच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे आहे. सुळे यांची मालमत्ता 2009 मध्ये 51.53 कोटी रुपयांवरून 2019 मध्ये 140.88 कोटी रुपयांपर्यंत वाढली. दहा वर्षांत त्यांची संपत्ती 89.35 कोटींनी वाढली. पुरी मतदारसंघातील बीजेडी खासदार पिनाकी मिश्रा संपत्ती वाढीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मिश्रा यांच्या संपत्तीत दहा वर्षांत 87.78 कोटींची वाढ झाली आहे. 2009 मध्ये त्यांची मालमत्ता 29.69 कोटी रुपये होती जी 2019 मध्ये वाढून 117.47 कोटी झाली.
केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या खासदारांमध्ये पीसी मोहन यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. वर्ष 2009 मध्ये बंगळुरूचे खासदार मोहन यांची संपत्ती पाच कोटी होती, ती 2019 मध्ये 75 कोटी झाली. पीलीभीतचे भाजप खासदार वरुण गांधी यांचेही नाव पहिल्या दहामध्ये आहे. वरुणची संपत्ती 2009 मध्ये 4.92 कोटी होती, ती 2019 मध्ये 60.32 कोटी झाली आहे. त्यांची संपत्ती 1124 टक्क्यांनी वाढली आहे.सुलतानपूरच्या भाजप खासदार मनेका गांधी यांची संपत्ती 17 कोटी होती, ती 2019 मध्ये 55 कोटी झाली.
या प्रकरणात दुसऱ्या क्रमांकावर असलेला पक्ष कॉंग्रेस असून, त्यांच्या 10 खासदारांच्या संपत्तीत सरासरी 10 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यात तिसरे नाव पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल कॉंग्रेसचे आहे. 71 पैकी सात लोकसभा सदस्यांच्या संपत्तीत सरासरी पाच कोटींची वाढ झाली आहे. वर्ष 2009 पासून विजयी झालेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांची सरासरी मालमत्ता 76 लाख होती, जी 2019 मध्ये वाढून 5.9 कोटी झाली आहे.