मुंबई : भारतीय जनता पक्षाशी जुळवून घ्या अशी साद शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घातली होती. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही विनंती केली आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना एकत्र येणार या चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चा सुरू असताना शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला आहे.
शिवसेनेने सर्जिकल स्ट्राईक करत भाजपच्या बालेकिल्ल्यातच खिंडार पाडल्याचे चित्र आहे. हिंगणघाटमधील भाजपचे १० नगरसेवक आणि २ माजी नगरसेवक शिवसेनेत सामील झाले आहेत. राजकीय वर्तुळात चर्चा काहीही असली तरी, शिवसेना पक्षसंघटन मजबूत करण्यावर भर देत असल्याचं चित्र आहे.
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या हिंगणघाटमधील नगरसेवक पक्षात घेऊन शिवसेनेने भाजपला आव्हान दिलं आहे. भाजपच्या १० नगरसेवक आणि २ माजी नगरसेवकांनी आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे हिंगणगाट नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. तरी देखील शिवसेनेने भाजपचे १० नगरसेवक फोडण्यात यश मिळवले.
याआधी जळगावमध्ये देखील शिवसेनेने भाजपचे २७ नगरसेवक आपल्याकडे घेऊन महापालिकेत सत्ता स्थापन केली. जळगावमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू गिरीश महाजन यांना शह देण्यात शिवसेनेने यश मिळवलं होतं.