‘बाळासाहेबांचं बोट धरून महाराष्ट्रात आलेलं भाजप त्यांच्याच पुत्राची खुर्ची ओढतंय’

नागपूर – बाळासाहेब ठाकरे यांनी बोट धरून भाजपला महाराष्ट्रात वर आणले आणि त्यांचाच मुलगा आज राज्याचा मुख्यमंत्री असताना त्यांची खुर्ची काढण्याचा जो प्रयत्न चालू आहे हे निषेधार्थ आहे, असे म्हणत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे.

विदर्भ दौऱ्यावर असणाऱ्या नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत भाजपावर टीका केली आहे. सरनाईक यांच्या पत्राविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला त्रास देत असल्याचे आपण पाहत असल्याचे म्हटले.

नाना पटोले म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांना नाहक त्रास दिला जात आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रातूनही ते स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील राजकीय बॉसच्या इशाऱ्यावरून विरोधकांवर दबाव आणण्याचे काम भाजप करत आहे.

ईडीच्या माध्यमातून विरोधकांना कसा त्रास दिला जातो हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या यांच्या बोलण्यातूनही वारंवार उघड झाले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच राज्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना पक्षाचे सरकार भक्कम आहे.

सरकारच्या कामगिरीवर जनताही समाधानी आहे. परंतु सत्ता नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेला भाजप सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्रास दिला जात आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे आतार्यंतचे सर्व प्रयत्न फेल गेले असून त्यांचा हा डाव सुद्धा यशस्वी होणार नाही, असही पटोले यांनी यावेळी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.