हाँग काँग – कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बनावट प्रतिमा किंवा व्हिडिओ म्हणजे डीप फेक समाज माध्यमावर अपलोड करण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे बर्याच चित्रपट कलाकारांना आणि राजकीय लोकांना तसेच खेळाडूंना मनस्ताप झाला आहे. याची भारत सरकारने गंभीर दखल घेऊन कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रतिमा किंवा व्हिडिओ नियमन करण्याच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
या तंत्रज्ञानावर जागतिक पातळीवर उलट सुलट चर्चा चालू असतानाच या तंत्रज्ञानाचा वापर करून एक बनावट झूम मीटिंग ( fake Zoom meeting) घेण्यात आली आणि याद्वारे तब्बल 25 दशलक्ष म्हणजे 200 कोटी रुपये पळविण्याचा प्रकार हाँगकाँग मध्ये घडला आहे.
आता ज्या बहुराष्ट्रीय कंपनीची ही मीटिंग घेण्यात आली होती त्या कंपनीने पोलिसात तक्रार दाखल केली असून या संदर्भात हाँगकाँग पोलीस चौकशी करीत आहेत. या मीटिंगमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून डीप फेक करणारा व्यक्ती सोडून बाकीच्या सर्व व्यक्ती बनावट होत्या. त्यामध्ये या कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकार्याचा ही समावेश होता. या मीटिंग मुळे संबंधित कंपनीच्या कर्मचार्यांची दिशाभूल झाली.
या मिटिंगमधील सर्व अधिकारी बनावट प्रतिमेद्वारा तयार करण्यात आले होते. या कंपनीच्या कर्मचार्याला ब्रिटन मधील बनावट सीएफआने हा व्यवहार करण्याची सूचना केली आणि या सर्व बाब खर्या वाटल्याने संबंधित कर्मचार्यांने हा व्यवहार केला. या कर्मचार्यांने 50 दशलक्ष डॉलरसाठी 15 व्यवहार पाच वेगवेगळ्या बँकात केले. या कर्मचार्याला थोडेफार शंका आली. मात्र सर्व परिस्थिती इतकी खरी वाटत होती की त्याला नंतर हे व्यवहार करणे योग्य वाटले.
हा व्यवहार आठवडाभर चालल्यानंतर संबंधित कर्मचार्याला संशय आला आणि त्याने फेरतपासणी केल्यानंतर आपण आणि कंपनी फसलो आहोत असे त्याच्या ध्यानात आले. या मीटिंगमधील सर्व कर्मचारी खरे वाटत होते आणि त्यांचे आवाजही खरे वाटत होते असे त्यांने सांगितले.
कोणालाही अटक नाही
आता हाँगकाँगचे पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहे. त्या संदर्भात बरीच माहिती जमा केली जात आहे. मात्र सध्या समोर कोणीच नसल्यामुळे आतापर्यंत कोणालाही अटक होऊ शकलेली नाही. या अगोदर अशा प्रकारचे व्यवहार अनेक बँकांच्या संदर्भात झाले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अशा प्रकारच्या खोट्या व्यवहारांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवण्यासाठी जागतिक पातळीवर समन्वयाने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.