नवी दिल्ली : केंद्रात मोदी सरकार येऊन आठ वर्ष पूर्ण झाले. अनेक नवनवीन योजना मोदी सरकार कडून आणल्या जात आहेत. अशातच आता आणखी एका योजनेची भर पडली आहे. ही योजना देशभरातील विद्यार्थ्यांसाठी असून आता देशभर ‘पीएम श्री स्कुल ‘ सुरु करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. प्रधान यांनी गुजरात येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण परिषद येथे ही माहिती दिली. विशेष म्हणजे या शाळा अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहेत तसेच NEP २०२० करिता एक प्रकारची प्रयोगशाळा असेल.
‘पीएम श्री शाळा’ राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रयोगशाळा असेल. गुजरात येथे देशभरातील शिक्षण मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर प्रधान यांनी याबाबत माहिती दिली. याबाबत बोलताना ते म्हणाले , ” २१ व्या शतकातील आपल्या नव्या पिढीचे ज्ञान आणि कौशल्य आपण अधिक समृद्ध केले पाहिजे. शालेय शिक्षण हा पाया आहे. भारताला ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था म्हणून प्रस्थापित करण्यासाठी पुढील २५ वर्षे महत्वाची आहेत. म्हणून ‘पीएम श्री स्कुल या योजनेवर भर दिला जात आहे. या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य तयार करणे हा असेल. त्यासाठी त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातील. सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि संपूर्ण शिक्षण प्रक्रियेला पीएम स्कुलच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.