शनिवारपासून होते बेपत्ता; नांदलापूर येथील खाणीत घडली घटना
कराड (प्रतिनिधी) –धनगरवाडी (नांदलापूर), ता. कराड येथील दोन सख्ख्या भावांचा खाणीतील डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज रविवार, दि. 10 रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. हनुमंत अशोक मुनेकर (वय 9) व उदय अशोक मुनेकर (वय 7) अशी डोहात बुडून मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत.
शनिवारी दुपारपासून ही मुले गायब झाली होती. घराच्या अंगणातून त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन त्यांना पळवून नेले असल्याची फिर्याद मुलांची आई भूमिका अशोक मुनेकर (रा.धनगरवाडी, नांदलापूर) यांनी शहर पोलिसात दिली होती.
पोलिसांनी सांगितले की, अशोक मुनेकर हे आपल्या पत्नी व तीन मुलांसह धनगरवाडी नांदलापूर येथे गेली बारा वर्षापासून वास्तव्यास आहेत. शनिवारी उदय व हनुमंत हे सकाळपासून पटांगणात खेळत होते. त्यानंतर त्यांची आई पटांगणात खेळत असलेल्या दोन्ही मुलांना बोलावण्यासाठी गेली असता त्यांना मुले दिसली नाहीत. मुलांबाबत शेजारी चौकशी केली असता दोन्ही मुले तेथेच खेळत असल्याचे सांगितले. त्यानंतर कुठे गेली माहीत नाही असे शेजारील महिलेने सांगितले. त्यानंतर मुलांच्या आई-वडिल व नातेवाईकांनी मुलांचा परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र मुलांचा पत्ता लागला नाही. अखेर त्यांच्या आईने कराड शहर पोलिसात याबाबत फिर्याद दिली.
पोलिसांनी नांदलापूर येथील खाणपट्ट्यात रविवारी दिवसभर मुलांचा शोध घेतला. तेव्हा खाणीतील एका डोहाच्या पाण्यात दोन्ही भावंडे तरंगताना आढळली. त्या दोन्ही भावंडांची कपडे खाणी शेजारीच असल्यामुळे खेळता-खेळता पोहायला जाऊन पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळेच पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी तात्काळ दोघांचे मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले. नाकातोंडात पाणी गेल्याने यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.