नवी दिल्ली : करोनाने पुन्हा एकदा देशात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत विकेण्ड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे.
राजधानीत शुक्रवारी सकाळी १० ते सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत कर्फ्यू लागू असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आता घरुन काम करावे लागणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना यामधून वगळण्यात आले आहे.
Weekend curfew to be imposed in Delhi following spike in COVID-19 cases: DDMA officials
— Press Trust of India (@PTI_News) January 4, 2022
विशेष म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना करोनाची लागण झाली आहे. स्वत: अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. अरविंद केजरीवाल यांनी आपल्याला सौम्य लक्षणं जाणवत असून घरात स्वत:ला विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर आता दिल्लीत विकेण्ड कर्फ्यू जाहीर करण्यात आल्याने परिस्थिती चिंताजनक असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
I have tested positive for Covid. Mild symptoms. Have isolated myself at home. Those who came in touch wid me in last few days, kindly isolate urself and get urself tested
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 4, 2022
“मी करोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. सौम्य लक्षणं आहेत. घरातच स्वत:ला विलगीकरणात ठेवलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवावं आणि चाचणी करुन घ्यावी,” असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे.
दिल्लीत वेगाने करोनाचा संसर्ग फैलावत असून चिंता वाढली आहे. सोमवारी दिल्लीत करोनाचे ४०९९ रुग्ण आढळले होते. दिल्लीतील वाढत्या करोना रुग्णांमुळे मंगळवारी सकाळी ११ वाजता डीडीएएमची एक बैठकदेखील आय़ोजित करण्यात आली. या बैठकीत करोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला.