मुंबई – राज्यात सद्या आमदार, खासदार व मंत्री यांना करोना लागण झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच शिवसेनेच्या तीन बड्या नेत्यांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई या तीन नेत्यांना करोनाची लागण झाली आहे. या नेत्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
”माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.!” असे ट्वीट अरविंद सावंत यांनी केले आहे.
”माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत.आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करा” अशी माहिती ट्वीट करत मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. यासह मंत्रीमंडळातील अनेत नेत्यांना करोनाचा फटका बसला आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार, वर्षा गायकवाड, भाजपचे नेते राधाकृ्ष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, कॉग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात, यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.