मुंबई – महाराष्ट्र सरकारच्या कोविड टास्कफोर्सची बैठक काल सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्यात राज्यातील निर्बंध आणखी शिथिल करण्यावर चर्चा झाली आहे. त्या संबंधातील नवीन नियमावली तयार केली जात असून ती लवकरच जाहीर केली जाणार आहे अशी माहिती अधिकृत सूत्रांनी आज दिली.
करोना निर्बंधांच्या संबंधात वैज्ञानिकस्तरावर विचार करून त्यानुसार राज्य सरकारला शिफारस करण्याचे काम टास्क फोर्सवर सोपवण्यात आले आहे. आणि त्याच आधारावर राज्य सरकार निर्बंधांबाबतचे निर्णय जाहीर करीत असते.
या बैठकीला मुख्यमंत्र्यांखेरीज राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्कफोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक अदि उपस्थित होते. करोना प्रसाराला आळा घालून आणखी निर्बंध कशा प्रकारे शिथिल केले जातील यावरच कालच्या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
संभाव्य तिसऱ्या लाटेतील आरोग्य सिद्धतेवरही यावेळी चर्चा झाली. सरकारने काहीं भागातील दुकाने आणि हॉटेल्स जास्त वेळ सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतला आहे. पण सिनेमा हॉल, रंगमंच, धार्मिक स्थळे अजून बंदच आहेत. मॉललाही पुर्ण मोकळीक अजून मिळालेली नाही. या बाबत येत्या काही दिवसांत नवीन निर्णय घेतला जाणार आहे.