विरार – आईच्या मारहाणीत दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मुंबईतील विरार परिसरात शनिवारी घडली. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपी आईला नेहा सोनुकुमार सोनी (वय 22) अटक केली आहे.
शनिवारी दुपारी नेहाने संतापाच्या भरात आपल्या दोन वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण केली. डोक्याला जबर मार लागल्याने चिमुकली बेशुद्ध झाली. त्यानंतर नेहाने पतीला फोन करून माहिती दिली. पतीने तातडीने मुलीला रुग्णालयात दाखल केले. मात्र डाॅक्टरांनी चिमुकलीला मृत घोषित केले. वडिलांच्या तक्रारीवरून सुरुवातील आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र सोमवारी मुलीच्या शवविच्छेदनात तिला शरिराच्या वेगवेगळ्या भागावर जबर मारहाण केल्याचे उघड झाले. त्यावरून पोलिसांनी तपास करून मुलीच्या आईवर हत्या केल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
आरोपी आई ही नेहमी घरात भांडण करत होती. आपल्या मुलांनाही ती वारंवार बेदम मारहाण करत होती. मुलांच्या ओरडण्याने जर कोणी घरात शेजारी सोडवायला किंवा समजावयाला गेले तर त्यांनाही उलटसुलट बोलून हाकलून देत होती. त्यातच रागाच्या भरात तिच्या हातून एका मुलीची हत्या झाली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शेजाऱ्यांनी दिली आहे.