लखनौ – भावाभावात अनेक ठिकाणी वाद होतात. मात्र हे वाद लवकर मिटतातही. मात्र एका भावाने मोबाईलच्या कारणावरून सख्ख्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे भावाचा खून करून आरोपीने त्याचा मृतदेह घरातच पुरला.
आपल्या भावानं स्वतःसाठी मोबाईल घेतला. मात्र आपल्याला घेतला नाही, या रागातून धाकट्या भावानं थोरल्या भावाची हत्या केली. फावड्याने वार करून भावाची हत्या केल्यानंतर घरातच त्याचा मृतदेह गाडला. मात्र 22 दिवसांनी दुर्गंधी सुटल्यानंतर या खुनाचा उलगडा झाला. उत्तर प्रदेशमधील फतेहपूर ढोला गावातील ही घटना आहे.
दोघं भाऊ एकाच घरात राहत होते. थोरला भाऊ फरमाननं त्याच्या वाढदिवशी नवा मोबाईल आणला. त्याचा मोबाईल पाहून त्याचा १६ वर्षाचा भाऊ मोबाईलसाठी हट्ट करू लागला. त्यातून दोघांमध्ये वादही झाला. या वादात धाकट्या भावाने फरमानच्या डोक्यात फावडं घातलं. यात फरमानचा जागीच मृत्यू झाला.
गुन्हा लपविण्यासाठी आरोपीने फरमानचा मृतदेह घरातच गाडला. त्यानंतर आपला भाऊ कामासाठी बाहेर गावी गेल्याचे तो सर्वांना सांगत होता. मात्र तीन आठवड्यानंतर घरातून दुर्गंधी येऊ लागली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडे विचारपूस केली.
दरम्यान आरोपीने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. या दोघांना भावांना तीन बहिणी आहेत. त्यांची लग्न झाली असून आई-वडिलांचं आधीच निधन झालेलं आहे.