डेहराडून –आम आदमी पक्षाला (आप) रामराम ठोकणाऱ्या निवृत्त कर्नल अजय कोठियाल यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. उत्तराखंडमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोठियाल हे आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार होते. त्यामुळे त्यांच्या पक्षबदलाचे राजकीय महत्व वाढले आहे.
उत्तराखंडमध्ये राजकीय प्रभाव निर्माण करण्याच्या उद्देशातून आपने नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक ताकदीने लढवली. मात्र, एकही जागा जिंकता न आल्याने त्या पक्षाचा भ्रमनिरास झाला. निवडणुकीत आपचा चेहरा असणाऱ्या कोठियाल यांचाही नामुष्कीजनक पराभव झाला.
त्या निवडणुकीनंतर आपकडून चांगली वागणूक न मिळाल्याने कोठियाल नाराज असल्याची चर्चा होती. तशातच त्यांनी 18 मे यादिवशी आपमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. आता कोठियाल भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.