मुंबई – डी कंपनीसाठी हॉटस्पॉट ठरलेले डोंगरी पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे. यंदा एमडी या अंमली पदार्थ तस्करीसाठी डोंगरी चर्चेला आले आहे. नार्कोटिक कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने मुंबईतील डोंगरी परिसरातून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा फर्दाफाश केला आहे. यात एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 20 किलो मेफेड्रोन जप्त केले आहे. याची अंदाजे 45 ते 50 कोटी रुपयांचे किंमत आहे.
एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, सिंडिकेट टोळीच्या एका महिलेसह दोन प्रमुख सदस्यांना अटक करण्यासाठी मोठी शोध मोहीम राबवण्यात आली होती. या कारवाईत 1.10 कोटी रुपयांची रोकडही जप्त केली असून छाप्यात 10 लाख रुपये किमतीचे 186.6 ग्रॅम सोन्याचे दागिनेही जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने हे ड्रग्समधून मिळालेल्या आर्थिक उत्पन्नातून घेण्यात आले होते.
एनसीबीला मुंबईच्या डोंगरी भागात असलेल्या एका रॅकेटबद्दल प्राथमिक माहिती मिळाली होती, ही टोळी मोठ्या प्रमाणात मेफेड्रोनच्या तस्करीमध्ये सक्रिय सहभागी असल्याची माहिती एनसीबीला समजली. ही टोळी एमएमआर प्रदेशाच्या विविध भागांमध्ये ड्रग्स विक्री करत होती. इंटेलिजन्स नेटवर्क तातडीने सक्रिय करण्यात आल्यामुळे त्वरित डोंगरी येथील एन. खान नावाच्या व्यक्तीची ओळख पटली.