पंढरपूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोने-चांदीचे गेल्या काही दिवसांपासून मोजमाप सुरू आहे. या दागिन्यांचे मोजमाप सुरू असताना 354 हिरे भक्ताने दान केल्याचे समोर आले आहे. या 354 हिऱ्यांची किंमत अंदाजे 30 ते 40 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे.
तुळजाभवानी मंदिरात दान अर्पण करण्याची एक पद्धत आहे. भाविक एका पाकिटामध्ये बंद करुन सोने-चांदीचे दागिने किंवा हिरे दानपेटीत टाकतात. त्यामुळे हे हिरे एकाच भविकाने दिले किंवा नेमके किती भाविकांनी दिले, याचा आकडा अद्याप समोर आला नाही.
एवढ्या प्रमाणात देवीच्या दानपेटीत हिरे आढळणे सर्वांना आश्चर्यचकित करुन टाकणारे आहे. कारण याआधी तिरुपती मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर आणि सिद्धीविनायकला इतक्या प्रमाणात दान केलेले आपण पाहिले असेल, पण तुळजाभवानी मंदिरात इतक्या प्रमाणात हिऱ्यांच्या दानाची ही पहिलीच घटना असेल.
दरम्यान, तुळजाभवानी देवीला नवसपूर्ती म्हणून अनेक भाविक सोने-चांदीच्या स्वरूपात दान अर्पण करतात. 15 वर्षानंतर सुरू करण्यात आलेली तिजोरीतील दान केलेल्या ऐवजाची मोजणी अजून महिनाभर चालणार आहे. आगामी एक महिन्यात जवळपास 200 किलो सोने आणि 4 हजार किलो चांदीचे मोजमाप करण्यात येणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर त्यांची शुद्धता तपासणी होणार आहे.