नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरचे (Jammu and Kashmir) माजी मंत्री चौधरी लाल सिंह (Chaudhari lal singh) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली. मनी लॉण्डरिंग प्रकरणी ती कारवाई करण्यात आली.
डोग्रा स्वाभिमान संघटन पक्षाचे अध्यक्ष असणारे सिंह एका शैक्षणिक ट्रस्ट विरोधातील प्रकरणावरून ईडीच्या रडारवर आले होते. त्यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
ईडीकडून (ED) तपास केल्या जाणाऱ्या प्रकरणातील ट्रस्टचे संचालन सिंह यांच्या माजी आमदार पत्नीकडून केले जाते. सिंह दोनवेळा खासदार आणि तीन वेळा आमदार बनले होते. त्यांनी 2014 यावर्षी कॉंग्रेसला (Congress) रामराम ठोकून भाजपमध्ये (Bjp) प्रवेश केला.
जम्मू-काश्मीरमधील मागील पीडीपी-भाजप सरकारमध्ये ते मंत्री होते. ते सरकार जून 2018 मध्ये कोसळले. त्याआधी काही महिने सिंह भाजपमधून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. त्यांच्या अटकेमुळे जम्मू-काश्मीरमधील राजकारण (jammu Kashmir politics) तापण्याची शक्यता आहे. ईडीने याआधीच सिंह यांची चौकशी केली होती. तसेच, काही ठिकाणी छापेही टाकले होते.