श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग विकास आराखडा अंतर्गत ‘भक्तनिवास’ इमारतीचे भूमिपूजन संपन्न

एकविसाव्या शतकात विकासाच्या कावड आपल्याला खांद्यावर वाहाव्या लागतील - पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड : एकविसाव्या शतकात विकासाच्या कावड आपल्याला वाहाव्या लागतील. श्रद्धा, प्रथा, परंपरा प्रत्येकामध्ये असुद्यात पण पुढच्या काळात या क्षेत्राच्या विकासासाठी प्रत्येकाला विकास कार्याच्या कावड आपल्या खांद्यावर घ्याव्या लागतील, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग विकास आराखडा अंतर्गत भक्तनिवास सुसज्ज इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचे गुरूवारी (22 जुलै) पालकमंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमास आमदार संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती शिवकन्या शिरसाट, जि. प. गटनेते अजय मुंडे, परळीच्या नगराध्यक्ष श्रीमती सरोजनी हालगे, उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, तहसीलदार सुरेश शेजुळ, मुख्याधिकारी अरविंद मुंडे, तसेच नगरसेवक, पदाधिकारी, नागरिक व अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी मंत्रीमहोदयांच्या हस्ते 133 कोटी रुपये विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातल्या 14 कोटी रुपये खर्चाच्या भक्त निवास या इमारतीचे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले परळी शहराच्या विकासाचा विचार करता भुयारी गटारांचे काम, रस्त्यातील खड्डे, थर्मल वीज निर्मिती प्रकल्पाच्या राखेमुळे होणारे प्रदूषण आदी प्रश्न आहेत. परंतु हे सर्व करण्याकरता वैद्यनाथावर जितकी श्रद्धा आहे. तितकीच श्रद्धा नागरिकांच्या सेवेसाठी आपल्या मनात आहे. या कामांना गती दिली जाईल.

ते पुढे म्हणाले येथून पुढे या क्षेत्राची ओळख श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग अशी होईल यासाठी येणाऱ्या कोणत्याही महामार्गावर अगदी चारशे किलोमीटर वर देखील तसाच फलक लागला जाईल यासाठी शासन निर्णय घेऊन कार्यवाही केली जाईल असेल पालक मंत्री मुंडे यांनी सांगितले

परळी-वैद्यनाथ आहे आपण सर्व भक्त आहोत. या ज्योतिर्लिंगाचे महत्व मोठे आहे. बारा ज्योतिर्लिंगाच्या नोंदी उज्जैन येथील महाकालेश्वर महंत यांचे कडे असून त्यामध्ये परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाची नोंद आहे. यामुळे हे धाम आहे की ज्योतिर्लिंग आहे. याबाबत शंका नाही. त्याच्या विकासातून सर्व या भागाचा देखील विकासात्मक बदल घडेल असे मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

यावेळी परळी वैजनाथ ट्रस्टच्यावतीने मंत्री महोदय आणि उपस्थित मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. विकास आराखड्याच्या माध्यमातून राज्य शासनाच्या मार्फत निधी उपलब्ध करून या कामास सुरुवात करण्यात येत असल्याबद्दल आभार मानण्यात आले. याप्रसंगी ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांचे सभापती श्रीमती उर्मिला मुंडे, श्रीमती अन्नपूर्णा आडतकर, श्री.गंगासागर शिंदे आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.