पुणे(प्रतिनिधी) – समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पुना गुजराथी बंधू समाजाच्या वतीने कोंढवा येथे खरेदी केलेल्या सहा एकरापैकी केळवणी मंडळाच्या दोन एकरमध्ये सीबीएससी इंटरनॅशनल स्कूलचे बांधकाम सुरू झाले. या इंटरनॅशनल स्कुलचे 80 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित चार एकरमध्ये गुजराथ भवन आणि गुजराथ क्लब बांधण्याचा निर्णय समाजाने घेतला आहे. पुना गुजराथी बंधू समाजाचा भूमिपूजन सोहळा पार पडल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त राजेश शहा यांनी दिली.
गुजराथ भवनचे भूमिपूजन आज संस्थेचे अध्यक्ष नितीन देसाई आणि राजेश शहा यांच्या झाले. भूमिपूजन प्रसंगी बांधकाम कमिटीचे अध्यक्ष अश्विन अजमेरा, उपाध्यक्ष भरत शहा, सहव्यवस्थापकीय विश्वस्त नैनेश नंदू आणि संस्थेचे इतर पदाधिकारी, विश्वत उपस्थित होते.
राजेश शहा म्हणाले, गुजराथी समाजाची सर्वात जुनी संस्था असलेली पुना गुजराथी बंधू समाजाची स्थापना 1993 साली झाली. त्यामुळे या ठिकाणी शाळेच्या बांधकामास सुरुवात झाली असून गुजराथ भवन आणि क्लब यांचे काम प्रगतीपथावर आहे. गुजराथ भवनमध्ये साधारण दहा हजार स्क्वेअर फूट वातानुकूलित दोन भव्य हॉल बांधण्यात येणार आहे. तर 40 लोकांना राहण्यासाठी वातानुकूलित खोली, मोठे रसोई घर, तळमजल्यावर मजली चारचाकी पार्किंग, दुचाकी पार्किंग या सुखसोयी असलेले दोन लाख फुटाचे गुजराथ भवन बांधण्याचा संकल्प समाजाने केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधारण सात ते आठ वर्षांपूर्वी पुणे येथे येऊन या जागेवर गुजरात भवन आणि शाळा बांधण्यात याव्या याबाबत मार्गदर्शन केले होते. त्यानुसार या दिशादर्शक प्रकल्पास सुरुवात करण्यात आली आल्याचे शहा यांनी सांगितले.