Gopichand Padlakar : विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padlakar) यांच्यावर इंदापूरमध्ये चप्पलफेक करण्यात आल्याची घटना काल घडली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ट्वीट (एक्स) वर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. इतकेच काय तर जशाच तसे उत्तर देणार असल्याचा इशाराही भुजबळ यांनी दिला.
छगन भुजबळ पोस्ट –
छगन भुजबळांनी एक्सवर पोस्ट करत लिहीले की, “आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, विरोध आहे तो झुंडशाहीला व दादागिरीला! ते पुढे म्हणाले, आज विधानपरिषद सदस्य गोपीचंदजी पडळकर यांच्यावर काही समाजकंटक लोकांनी विकृती दाखवून व लोकशाही पायदळी तुडवून हल्ला केल्याची बातमी समजली! या घटनेचा आम्ही सर्वजण तीव्र निषेध करतो! मी आजही इंदापूर येथे जाहीर सभेत सांगितल आहे की ही दादागिरी थांबली नाही तर याला आम्ही जशास तसे उत्तर देऊ!”
नेमकं काय घडलं?
इंदापूर येथे काल (९ डिसेंबर) ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर, अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ उपस्थित होते. या मेळाव्यातून पडळकर आणि भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांवर निशाणा साधला. तसंच, मराठा आंदोलनावरही टीका केली. त्यानंतर गोपीचंद पडळकर शेजारी सुरू असलेल्या आंदोलन स्थळाला भेट देण्याकरता गेले होते. तिथं शेजारीच मराठा समाजाकडून आरक्षण मागणीसाठीचे साखळी उपोषण सुरू होते. यावेळी मराठा समाजाकडून पडळकरांवर चप्पल फेक करण्यात आली.
गोपीचंद पडळकरांनी काल मराठा समाजाला देत असलेल्या कुणबी दाखल्यावर आक्षेप घेतला. इंदापूर येथे झालेल्या सभेत ते म्हणाले, “ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना सरसकट कुणबी दाखले देण्यात आले. परंतु, आमच्या समाजातील काही लोकांना दाखले मिळण्याकरता चार चार महिने वाट पाहावी लागते, त्यांच्याकडून पुरावे मागितले जातात.” तर दुसरीकडे भुजबळ यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
“आमचा मराठा समाजाला नव्हे तर सुरु असलेल्या झुंडशाहीला विरोध आहे. आरक्षण देणे म्हणजे ‘गरीबी हटाव’चा कार्यक्रम नाही. दलित समाजाला आरक्षण मिळाले. त्यामुळे नोकऱ्या मिळाल्या. परंतू गरीबी हटली नाही. जो वर्ग खरोखरच उपेक्षित राहिला आहे, त्याला प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आहे.ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या उपेक्षितांना आरक्षण द्यावे. त्यांना जे दिले तेच ओबीसी समाजाला द्यावे. गेल्या दोन महिन्यात दिलेल्या कुणबी दाखल्यांना स्थगिती द्या,” असे भुजबळ म्हणाले.