राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्ये नाराजी; आता “पक्षांतर’ का? “दबावतंत्र’
– सागर येवले
पुणे – आगामी विधानसभा निवडणुकीत भोर, जुन्नर आणि पुरंदर मतदारसंघ कॉंग्रेसकडे जाईल, असे वृत्त मुंबईतून पुण्यात पोहोचताच राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेषत: भोर विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी लागेचच पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे आपली नाराजी बोलून दाखविली. त्यामुळे नाराज झालेले इच्छुक “पक्षांतर’ करणार? का पक्षांतराचे “दबावतंत्र’ वापरून कोणत्या पदाचे आश्वासन घेणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबई येथे नुकतीच बैठक पार पडली. ही बैठक अगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी बोलविण्यात आली होती. प्राथमिक चर्चेनंतर सूत्रांकडून पुणे जिल्ह्यातील भोर, जुन्नर आणि पुरंदर मतदारसंघ कॉंग्रेसला सोडण्यात आल्याचे वृत्त जिल्ह्यात पोहोचले. त्यामुळे या मतदारसंघातील इच्छुकांमध्ये गडबड सुरू झाली. तर काही मतदारसंघात आनंदाचे वातावरण होत; परंतु काही मतदारसंघात दोन्ही पक्षातील इच्छुकांच्या कुरघुड्या सुरू झाल्या, नाराजीचा सुरू वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचल्यावर “ही प्राथमिक बैठक असून अद्याप ठोस निर्णय झालेला नाही, असे वरिष्ठ नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
या वृत्तामुळे भोर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे इच्छुक नाराज झाले आहेत. तर उलट इंदापूर तालुक्यात कॉंग्रेसचे इच्छुक नाराज झाल्याचे दिसून आले. राजकारण म्हटल्यावर “थोडी खुशी-थोडी गम’ होणारच; परंतु भोर विधानसभा म्हणजे कॉंग्रेसचा बालेकिल्ला असे म्हटले जाते. त्यामुळे या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी प्रबळ असल्याचा दावा करत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घ्यावा, असे साकडे इच्छुकांनी पक्षाकडे घातले आहे. एवढच नव्हे तर मतदारसंघ सुटणार नसेल, उमेदवारी मिळणार नसेल तर अन्य पक्षाचा विचार करावा लागेल असे संकेतही इच्छुकांनी बोलून दाखविले. काही इच्छुक “मातोश्री’वर तर काही भाजपा कार्यालयात जावूनही आले आहेत. दरम्यान, “दैनिक प्रभात’ने काही दिवसांपूर्वीच भोरमधील राष्ट्रवादीचे चार इच्छुक शिवसेनेच्या वाटेवर असे वृत्त दिले होते. त्यातील एकाने नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे.
पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष
आता मतदारसंघ आपल्याला सुटणार नसेल तर उमेदवारी कोठून मिळणार या विचाराने इच्छुकांच्या डोक्यात पुन्हा पक्षांतराचे “भुंगे’ सुरू झाले आहेत. काही इच्छुकांनी जिथे असतील तिथे जावून वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आणि नाराजी बोलून दाखविली. त्यावर पक्षाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच हे इच्छुक पक्षांतराच्या नावाखाली भविष्यात “पदाची’ मांडवली करणार अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे कारण जि.प.च्या अध्यक्षपासून सभापती पदे पी.डी.सी. बॅंक यासह विविध पदे बदलण्यात येणार आहे. त्यामुळे हा खटाटोप सुरू असल्याचे बोलले जात आहे.